हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक मुंबईत आयोजित केली आहे अशाही बातम्या सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच आपलं मौन सोडलं आहे. अजित पवार यांच्या बाबतीत सुरू असलेल्या चर्चांना काही महत्व नाही असं त्यांनी म्हंटल आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या मिडियाच्या मनातील आहेत, आमच्या मनात अस काहीच नाही. त्यामुळे अजित पवारांबाबत सुरू असलेल्या या चर्चाना काहीच महत्व नाही. अजित पवारांनी मुंबई मध्ये कोणतीही बैठक बोलवलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते पक्षावाढी साठी कार्यरत आहेत अस म्हणत शरद पवारांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांवरील हवाच काढून टाकली.
दरम्यान, अजित पवार यांनी सुद्धा या सर्व घडामोडींवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नव्या राजकीय समिकारणांना तथ्य नाही. भाजप आणि शिंदे गटाकडून हे वक्तव्य केले जात आहे, त्यात तथ्य नाही अस म्हणत त्यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.