शिंदेंची जागा अजितदादा घेणार? दिल्लीत मोठ्या घडामोडी; इंग्रजी वृत्तपत्राच्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काही मोठ्या दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्ट केव्हाही निकाल देऊ शकत. परंतु तत्पूर्वीच आता एकनाथ शिंदे यांची जागा अजित पवार (Ajit Pawar) घेणार असलयाचे खळबळजनक वृत्त न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यात याबाबत बैठक झाल्याचेही म्हंटल आहे.

न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण करायचे असून त्यांना राष्ट्रवादीच्या 35-40 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे पक्षांतर विरोधी कायदा लागू होणार नाही. परंतु पक्षातील वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे की त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची संमती मिळवावी नाहीतर 2019 सारखी परिस्थिती व्हायची. 2019 मध्ये, अजित पवारांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला होता. परंतु नंतर पवारांच्या कठोर भूमिकेमुळे ते सर्व आमदार राष्ट्रवादीत परतले.

भाजपसोबत जायच की नाही याबाबत स्वतः निर्णय घ्या असं शरद पवारांनी अजित पवारांना सांगितलं आहे. मात्र कोणत्या परिस्थितीत शरद पवार हे भाजपसोबत जाऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला डाग लावायला तयार नाहीत. अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांनी याची चांगलीच जाणीव आहे की शरद पवारांच्या जनभावना बदलण्याच्या क्षमतेमुळे त्यांच्या विरोधात जाणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरू शकते, त्यामुळेच शरद पवारांचा पाठिंबा घ्यावा असं आमदारांनी अजितदादांना सांगितलं आहे.

धक्कादायक म्हणजे 8 एप्रिल रोजी जेव्हा अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा बातम्या पसरल्या होत्या त्यावेळी त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली आणि याबाबत फायनल डील केली. त्यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुद्धा खातेवाटपाचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्यासोबत होते असेही इंग्रजी वृत्तपत्रात म्हंटल आहे.

भाजपला अजितदादा का हवेत?

एकनाथ शिंदे याना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळालं असलं तरी महाराष्ट्रात अजूनही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार, राज्यातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 33 जागा मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला महाराष्ट्र गमावायचा नाही. महाराष्ट्रात 35 टक्के मतदार मराठा असल्यामुळे भाजपला मुख्यमंत्रीपदी मराठा चेहरा पाहिजे. यासाठीच अजित पवार यांना खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे.