हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह इतर विभागात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. विदर्भ व मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी पवारांनी केली आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, जून महिन्याच्या जवळपास 20 तारखेपासून ते आजपर्यंत सातत्याने पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांमध्ये मी स्वतः पाहणी केली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी सातत्याने दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या असून घराचीही पडझड झाली आहे. तरीही या ठिकाणी पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकलेले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून मदत करणे आवश्यक आहे.