महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरु; आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर पवारांची प्रतिक्रिया

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. याबाबत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू आहे. आव्हाडांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे हा भ्याडपणा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष देण्याची गरज आहे. कोणतेही कारण नसताना जर लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे, अपमानित करण्याचे काम होत असेल तर जनतेने याची दखल घ्यायला हवी,” असे पवार यांनी म्हंटले.

अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आव्हाड यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, आव्हाड यांनी म्हंटले की, दोन-दोन गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न माझ्यावर केला जातो त्याला कंटाळून मी राजीनामा देतोय. त्यांनी आपला पदाचा राजीनामा देऊ नये.

राज्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याला बगल देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अशा घटना समोर आणल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले. विवियाना मॉल प्रकरणातील प्रेक्षकाने आव्हाड यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. तरीदेखील त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आला नाही. दिवस बदलतात. चार दिवस सासूचे असतात, तसे चार दिवस सुनेचे असतात,असे पवार यांनी म्हंटले.

नेमका काय घडला प्रकार?

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केला असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला. त्यानंतर आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विनयभंग झाला कि नाही हे मुख्यमंत्र्यांनीच सांगावे…

जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जो काही प्रकार घडला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी पाच ते दहा फुटांवर उभी होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांनीच त्याठिकाणी विनयभंगासारखा प्रकार घडला नाही, हे समोर येऊन स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.