हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा जोरात सुरु आहेत. अजित पवारांनी या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली अशी बातमी इंग्रजी वृत्तपत्र द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिल्यांनतर खळबळ उडाली होती. आता तर अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे ५३ पैकी ४० आमदार असून त्यांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्याचे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी संमतीच्या सह्या दिल्या आहेत. वेळ आल्यावर ही यादी राज्यपालांना सादर केली जाईल. विशेष म्हणजे या आमदारांमध्ये शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ आमदारही अजित पवारांच्या सोबत आहेत असाही दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र अजूनही या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे. अजित राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या सह्या घेण्यासाठी वैयक्तिकरित्या बोलावत असताना, मोठ्या पवारांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अखेरच्या क्षणी शरद पवार यामध्ये हस्तक्षेप करून पारडं फिरवू शकतात. परंतु, शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ आमदारही अजित पवारांच्या सत्ताबदलाला पाठिंबा देत आहेत, असा दावाही इंग्रजी वृत्तपत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.