नाशिक प्रतिनिधी भाजपा पक्षाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील तोच युतीचा फॉर्म्युला असेल, त्याबाबत मध्ये कोणीही काही मत मांडण्याची गरज नाही, असा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेत युतीची चर्चा सुरू झाली असली तरी जागावाटपासाठी ५०:५० चा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असे महाजन यांनी स्पष्ट सांगितले.पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपा-शिवसेनीची युती व्हावी, अशी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची इच्छा आहे. सध्या राज्यातील २८८ पैकी भाजपाचे १२३ तर शिवसेनेचे ६२ आमदार आहेत. काही जागांबाबत वाद आहेत; मात्र मुख्यमंत्री फडणवीस जागा वाटपाच्या चर्चेत स्वत: लक्ष घालत असल्याने तोडगा निघेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांच्या भाजपा तर छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेविषयी ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ’, असे आमचे ठरलेले नाही, अशी मिष्कीलपणे ते म्हणाले.
कुंभमेळ्यातील संतांकडून महाजन यांनी वशीकरणमंत्र घेतला आहे आणि या मंत्रानेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना वश केले, असे व्यंगात्मक वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यंनी जळगावमधील पक्षाच्या बैठकीत केले आणि महाजन यांना आगामी निवडणुकीत पराभूत न केल्यास वडिलांचे नाव लावणार नाही, असे आव्हानही दिले होते.