हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध विषयांवर भाष्य करत ठाकरे सरकार वर निशाणा साधला.
किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे. साक्षीदार फोडण्याचं काम करत आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा अनिल देशमुखांच्या वकिलाने प्रयत्न केला. त्यामुळे अशा व्यक्तिंना बाहेर ठेवणं धोकादायक आहे. म्हणून देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित करा. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घोटाळ्यांवरही भाष्य केलं. अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. मंत्र्यांचे हे घोटाळे असेच चालू राहिले तर भ्रष्ट्राचारी नेत्यांची यादी वाढणार आहे असा सूचक इशारा त्यांनी दिला.