हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही आले होते. यावेळी त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्याचा प्रकार घडला. या घडलेल्या प्रकारावरून भाजप नेते आक्रमक झाले असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “केंद्रीय मंत्र्यांना चौकशीसाठी नऊ-दहा तास बसवून ठेवले जात आहे. विरोधीपक्ष नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार? असा सवाल शेलार यांची केला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज मोठ्या प्रमाणात ठाकरे सरकारच्या राज्यात अराजकता पसरत चालली आहे, विनाकारण भाजप नेत्यांना व मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. केंद्रीय मंत्र्यांना चौकशीसाठी नऊ-दहा तास बसवून ठेवले जात आहे. आमदारांना अटकपूर्व जामिनाचे प्रोटेक्शन असतानाही डांबून ठेवण्याचे काम केले जात आहे.
एखादी तक्रार घेऊन तक्रारदार म्हणून पोलिसांकडे जाणाऱ्या किरीट सोमय्या, करुणा शर्मा यांच्यावरच उलट केस दाखल केली जात आहे. आता विरोधीपक्ष नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार हे बघायचं आहे, अशी टीका शेलार यांनी यावेळी ठाकरे सरकावर केली.