अश्विन-मिताली खेलरत्न तर धवन-केएल आणि बुमराह अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) यांची खेलरत्न पुरस्कारासाठी (Khel Ratna) शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी (Arjuna Award) शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावांचीही भारतीय मंडळाने शिफारस केली आहे.

वृत्तसंस्था ANI च्या माहितीनुसार BCCI च्या एका सूत्राने सांगितले की, “आमची सविस्तर चर्चा झाली. अश्विन आणि महिला कसोटी तसेच वनडे कर्णधार असलेली मिताली राज यांची नावे खेलरत्नसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. आम्ही अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवनची पुन्हा शिफारस करत आहोत तर या पुरस्कारासाठी केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची नावेही दिली गेली आहेत.”

क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी नामांकन पाठवण्याची मुदत एका आठवड्यापर्यंत 5 जुलैपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी राष्ट्रीय क्रीडा महासंघ 28 जूनपर्यंत अर्ज पाठवणार होते. क्रीडा मंत्रालयाने एका परिपत्रकात म्हटले आहे की, “अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 28 जून 2021वरून 5 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.” टेनिस, बॉक्सिंग आणि कुस्तीसह अनेक NSF ने नामांकने पाठवली आहेत तर BCCI त्यांना काही दिवसांत पाठवेल. ओडिशा सरकारने दुती चंदचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी पाठविले आहे.

मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनानुसार, या पुरस्कारासाठी पात्र खेळाडू / प्रशिक्षक / संस्था / विद्यापीठांकडून नामनिर्देशन / अर्ज मागविण्यात आले होते आणि त्यांना ई-मेल केले जाईल. अभूतपूर्व कामगिरी करण्यात आल्यामुळे मागील वर्षी पाच भारतीय खेळाडूंना खेलरत्न देण्यात आला. गेल्या वर्षी मानिका बत्रा, रोहित शर्मा, विनेश फोगट, राणी रामपाल आणि मारियाप्पन फंगावेलू यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. भारतीय क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच पाच भारतीय खेळाडूंना एकाच वर्षात खेलरत्न देण्यात आले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group