मुंबई प्रतिनिधी | राजकारण कोणता व्यक्ती कोणत्या पक्षात जाईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. राजकीय विचारधारा हि बाब कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. अशाच पक्षांतराच्या वादळात काँग्रेस सोडलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत फोन वरून चर्चा केल्याचे देखील समजते.
काँग्रेस पक्षात असणाऱ्या गटबाजीला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आहे. लोकसभा निडणुकीच्या आधी त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. मात्र भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता.
उर्मिला मातोंडकर यांनी मात्र त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेला नाकारले असून आपण शिवसेनेत जाण्याचा विचार करत नसल्याचे म्हणले आहे. मराठी कलाकार म्हणून आपला आणि मातोश्रीचा अनेक वर्षांचा स्नेह आहे. त्या स्नेहातूनच मी मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत बातचीत केली. त्या बोलण्याचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नव्हता असे उर्मिल मातोंडकर यांनी म्हणले आहे. लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांनी भाजपवर टीका केली. मात्र शिवसेनेवर त्यांनी कधीही टीका केली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचा हातचा राखून ठेवला होता काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत असल्याचे दिसते आहे.