‘त्या’ १६ मजुरांचा समावेश कोरोना बळींच्या यादीत करा; सामनातून शिवसेनेची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मालगाडीखाली चिरडून मरण पावलेल्या १६ स्थलांतरित मजुरांची नोंद करोना बळींमध्ये करायला हवी, अशी मागणी सामानाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केली आहे. ‘औरंगाबादजवळ रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले १६ स्थलांतरित मजूर हे करोना आणि लॉकडाऊनचेच बळी आहेत. त्यामुळं त्यांच्या मृत्यूची ‘अपघाती’ म्हणून नोंद न करता करोना बळींच्या यादीत त्यांचा समावेश व्हायला हवा,’ अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत सातत्यानं वाढ होत असल्यामुळं जालन्यातून काही स्थलांतरित मजूर मध्य प्रदेशातील आपल्या गावाकडे रेल्वे रुळांवरून पायी चालत निघाले होते. मात्र, शुक्रवारी त्यांचा मालगाडीखाली येऊन चिरडून अपघाती मृत्यू झाला. त्यामुळं देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून याच मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं व रेल्वे प्रशासनानं आता अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना मदतीच्या घोषणा झाल्या आहेत. पण गेलेल्या जीवांचं काय?, स्थलांतरित मजुरांच्या बाबतीत सरकारनं नेमकं केलं काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

कोरोनामुळे जनतेच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून ‘लॉकडाऊन’ केलं, पण मजूरवर्ग लॉकडाऊनमध्ये एक तर उपासमारीने मरत आहे, नाहीतर अशा पायदळ प्रवासात चिरडून किंवा दमून मरत आहे. हे सुद्धा करोनाचे आणि लॉकडाऊनचे बळी आहेत. रेल्वेखाली चिरडून मारल्या गेलेल्या मजुरांना कोरोना संक्रमणाची कोणतीही लक्षणे नव्हती. त्यांना थंडी भरून ताप आला नाही. त्यांना सर्दी-खोकला नव्हता. त्यांना श्वास घेण्यास अडथळे नव्हते. त्यांची प्रकृती चांगली होती तरीही ते कोरोनाचे बळी आहेत व त्यांच्या मृत्यूची जबाबदारी शेवटी सरकारवरच येते. रोजच्या रोज कोरोनाच्या नव्या मृतांचे आकडे प्रसिद्ध होत असतात. त्यात या १६ जणांचा समावेश व्हायला हवा,’ असं अग्रलेखात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment