औरंगाबाद । पोलीस कोठडीत असलेल्या एका 42 वर्षीय आरोपीचा स्वाब नमुन्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यातील सुमारे 30 ते 35 पोलीस अधिकारी-कर्मचारी या कोरोनाबधित आरोपीच्या संपर्कात आले होते. त्या सर्वांची कोविड१९ चाचणीनंतर त्यांना क्वांरन्टीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे.
प्रतिबंधित नशेच्या गोळ्यांची विक्री करीत असताना सिटी चौक पोलिसांनी चेलीपुरा भागातून एका 42 वर्षीय आरोपीला छापा टाकून नशेच्या गोळ्या सहित अटक केली होती. अटकेनंतर कोरोना सारखी लक्षणे दिसत असल्याने आरोपीचे स्वाब नमुने घेण्यात आले होते. दरम्यान आरोपीला न्यायालयाने कोठडी सुनावल्याने आरोपीला सिटी चौक पोलीस ठाण्यातील पहिल्या मजल्यावरील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.
तीन दिवसांच्या या कालावधीत सिटी चौक पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा आरोपीशी संपर्क आला होता. आरोपीच्या स्वाब नमुन्याचा रिपोर्ट मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या संपर्कात ठाण्यातील सुमारे 30 ते 35 कर्मचारी-अधिकारी यांचा संपर्क आलेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना क्वांरन्टीन करण्यात येणार आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वाब अहवालाकडे आता सर्व पोलीस दलाची नजर लागून आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”