Sunday, May 28, 2023

टेंभू उपसासिंचन योजनेच्या पाण्याचा मुद्दा बाळासाहेब पाटलांनी मांडला अधिवेशनात

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कराड उत्तरचे आमदार तथा माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी टेंभू उपसासिंचन योजनेच्या पाण्याच्या मुद्दा मांडला. टेंभू उपसासिंचन योजनेचे पाणी कराड तालुक्यातील टेंभू गावापासून उचलण्यात येते, ते पाणी पुढे दुष्काळी भागाला जात असताना कराड तालुक्यातील शामगाव या गावाला दिले जावे, अशी मागणी आ. पाटील यांनी केली.

राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात आ. बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुक्यातील महत्वाच्या असणाऱ्या टेंभू उपसासिंचन योजनेच्या पाणी पुरवठ्याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली. यावेळी ते म्हणाले की, टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचा कराड तालुक्यातील दोन गावांना त्याचा लाभ होतो. परंतु कराड तालुक्यातील शामगांव गावाच्या शेजारी असणाऱ्या बोंबाळेवाडी तलावातून हे पाणी पुढे खानापूर तालुक्यातून पुढे आटपाडीकडे जाते. त्या योजनेचे पाणी शामगांव गावाला उपलब्ध केल्यास येथील शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळू शकेल.

कराड तालुक्यातील शामगाव या गावाला पाणी मिळण्यासाठी ही योजना राज्य सरकारकडून हातामध्ये घेतली जाणार आहे का? असा प्रश्न आ. बाळासाहेब पाटील यांनी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विचारला. टेंभू येथील उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागांना पाणी पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न आ. पाटील यांनी विधानसभेत उचलून धरला.