हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न केले जात होते. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडूनही अनेक नावे देण्यात आली. आता दरम्यान अध्यक्षपदाबाबत काँग्रेसच्या हालचाली वाढल्या असून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे नुकतेच दिल्लीत दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीची चार नावे घेऊन काँग्रेस नेते थोरात पक्षश्रेष्टींची भेट घेणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद गेल्यावर्षभरापासून रिक्त आहे. लवकरच विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. विधानसभा अध्यक्ष पदाबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले होते. त्यानुसार ते आज दिल्लीला गेले आहेत.
विशेष म्हणजे या चार नावामध्ये संग्राम धोपटे, सुरेश वरपुडकर, सुरेश धोटे आणि अमीन पटेल यांच्या नावाचा समावेश आहे. तर काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे.