हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा आणि शिंदे गटाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार टोलेबाजी रंगली. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारात टोला लगावला. “फडणवीस यांची प्रत्येकाशी जवळीक होती. अजित पवारांशी, आदित्य ठाकरेशीही. तुम्ही त्यांना कायदा शिकवला. मग तुम्ही काँग्रेसच का बाजूला ठेवली? फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं? तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले? असा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना यावेळी विचारला.
विधानसभेच्या विशेष अधिवेशातील चर्चेवेळी बाळासाहेब थॊरात म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. आता देवेंद्र फडणवीस तुमचे अभिनंदन कसे करावे? असा प्रश्न पडला आहे. छगन भुजबळांनी उल्लेख केलेल्या बुद्धिबळाच्या खेळाकडे तुमचेच लक्ष नव्हते असे वाटत आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ अचानक उठून उभे राहिले. त्यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला एक मेसेज सभागृहास वाचून दाखवला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टोला लगावला. “जगातील सर्व खेळाडूंचा पराभव करणारे विश्वनाथन यांनी अमित शाह यांच्यासोबत खेळण्यास नकार दिला आहे, असे भुजबळ यांनी म्हंटले.