IPL भरवण्याबाबत BCCI ने केले ‘हे’ मोठे विधान…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून क्रीडा संकुल आणि स्टेडियम ​​सशर्तपणे उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र असे असूनही, बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीत आयपीएल आयोजित करण्याबाबत विचार करणे हे फार घाईचे ठरणार असल्याचे म्हटले आहे.

सरकारने रविवारी ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. लॉकडाऊन असूनही, देशभरातील क्रीडा संकुले आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडता येतील, अशी मार्गदर्शक सूचना गृह मंत्रालयाने जाहीर केली आहे. मात्र , अशा स्पर्धा आयोजित करण्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षक एकत्र येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयनेही सरकारच्या या आदेशाचे स्वागत केले आहे.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सोमवारी सांगितले की,’सरकारने स्टेडियम उघडण्यास परवानगी दिली असली तरी ३१ मे पर्यंत देशभरात हवाई प्रवासावर बंदी आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आयपीएलच्या १३ व्या सत्राच्या आयोजनाचा विचार करणे हे फार घाईचे ठरेल. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन तसेच विदेशी खेळाडूंच्या प्रवाशावर बंदी असल्याने बीसीसीआयने एप्रिलमध्ये आयपीएलला अनिश्चित काळासाठी तहकूब केले.’

‘यावर्षी बीसीसीआय आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करीत आहे का?’ असे विचारले असता धुमाळ म्हणाले की, ‘सध्याच्या परिस्थितीत या स्पर्धेचे आयोजन करण्याबद्दल विचार करणे हे फार घाईचे ठरेल.’ ते म्हणाले की, ‘जगभरातील परदेशी प्रवासावरील बंदी काढून क्रिकेट कॅलेंडरकडे पाहिल्यानंतर आयपीएलसाठी एखादी विंडो बघावी लागेल.’ दरम्यान, आयपीएलचे फ्रँचायझी संघ बीसीसीआयच्या आयपीएल नियोजनावरील निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.

आयपीएलच्या एका फ्रेंचायझीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की,’ सरकारच्या या आदेशाचा बीसीसीआयवर परिणाम होईल आणि यामुळे आयपीएलच्या आयोजनासाठीची सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.