उद्धव ठाकरे संत, पण शकुनी मामाच्या विळख्यात अडकले; कोश्यारींचा रोख कोणाकडे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना चिन्ह आणि नावाबाबत आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे माजी राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी प्रतिक्रिया दिली असून एकीकडे उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत मोठी खंत व्यक्त केली. “उद्धव ठाकरे संत व्यक्ती आहे. ते राजकारणात फसले आहेत. सर्वांना माहितीच आहे की ते कशाप्रकारे अडकले आहेत, असे कोश्यारींनी म्हंटले आहे.

भगतसिह कोश्यारी यांनी आज एका वृत्तमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांच्याशी माझे संबंध खूप चांगले होते. पण उद्धव ठाकरेंचे सल्लागार कोण होते? हे सर्वांना माहिती आहे. त्यांचे सर्व आमदार येऊन म्हणायचे की तुम्ही आम्हाला वाचवा, उद्धव हे शकुनी मामाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यांचा शकुनी मामा कोण होता माहीत नाही.

उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यांनी यापासून लांब राहावं, अशी प्रार्थना मी देवापुढे करतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, त्यांनी संघटना चालवायला पाहिजे होती. उद्धव ठाकरेंना सुळीवर चढवण्यात आलं. मला त्यांच्यावर दया येते. उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं, प्रभूने त्यांना गादीवरून उतरवलं. मी त्यांना सत्तेतून खाली उतरवलं नाही.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसताना त्यांना जबरदस्तीने तिकडे बसवण्यात आलं. उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बळीचा बकरा बनवलं. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कधीच योग्य नव्हते, त्यांनी पक्ष सांभाळायला हवा होता,’ असा टोलाही  कोश्यारी यांनी लगावला.

वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहिलेले भगतसिंह कोश्यारी हे नुकतेच राज्यपाल पदावरुन पाय उतार झाले आहेत. त्यांनी स्वतःहून या पदाचा राजीनामा दिला. एकीकडे त्यांनी राजीनामा दिला. दुसरीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गतता वाद सुरु होता. या वादादरम्यान आयोगाने महत्वपूर्ण निकाल दिला. आता या निकालावर कोश्यारींनी प्रतिक्रिया दिली आहे.