कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे सांगत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी पटोलेंना अटक करण्याचीही मागणी केली आहे. “पटोले यांच्यावर टीका करताना भाजप नेते, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनीही आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अनिल बोंडे याच्या विरोधात राज्यभर गुन्हे दाखल करणार आहोत, असा इशारा कराड येथे काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
कराड येथे काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असे नाव वापरलेले नाही. तरीही पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलले असे सांगत त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने अर्थाचा अनर्थ काढला आहे.
भाजपने ओबीसींचे आरक्षण पुर्णपणे संपवले आहे. भाजपचे राम कदम, आशीश शेलार यांनी महिलांच्या बाबतीत काय वक्तव्य केले हेही बघणे महत्वाचे आहे. त्यातुन भाजपची संस्कृती दिसुन येते. देशाची संपती विकायला लागले आहेत. ते देश विकतील अशी स्थिती आहे. त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजपने हा नवीन मुद्दा उपस्थित केला आहे. त्याचा कॉंग्रेस ओबीसी विभागाकडुन निषेध केला जात आहे.
भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी पटोले यांच्या विरोधात भयानक वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यातील सर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांच्या अटकेची मागणी करत आहोत. ओबीसी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाला भारी पडत असल्यामुळे त्यांच्या पायाखालील जमीन सरकली. बोंडे यांनी तोंड आवरावे. आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत, असा इशारा यावेळी माळी यांनी दिला.