हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना फोडण्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘’जेपी नड्डा यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा केली, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे नव्हते म्हटले. मात्र, त्यांना असे म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस देत आहे. जणू आता संपूर्ण देशात फडणवीस एकटचे भाजपाचे चाणक्य उरले आहेत,” अशी टीका जाधव यांनी केली.
भास्कर जाधव यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ’भाजपाची विश्वासार्हता आता उरलेली नाही. ‘भाजपचा एक इतिहास आणि परंपरा आहे. हा पक्ष विरोधकांना नाही तर ज्या पक्षाशी मैत्री करतात त्यांना संपवतो. त्यामुळे त्यांनी शिवसेनेसारखा २७ वर्ष जूना आणि प्रामाणिक तसेच भाजपाच्या प्रत्येक अडचणीत सोबत राहिलेला पक्षही त्यांनी फोडला आहे. ही बंडाळी झाल्यानंतर भाजपाचे नेते म्हणत होते, की त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. मात्र, जे भाजपाच्या पोटात दडले होते ते त्यांच्याच पक्षातील नेते सुशील मोदी यांच्या ओठावर आले. त्यानिमित्ताने भाजपाचा विद्रुप चेहरा पुढे आला.’
सत्ता उपभोगायची एवढाच भाजपाचा डाव – जाधव
यावेळी बंडखोर आमदारांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून जाधव यांनी भाजपवर टीका केला. ‘जे आमदार शिवसेना सोडून गेले त्यांना आता कळून चुकले आहे की, त्यांना मदत करण्यासाठी भाजपाने शिवसेना फोडली नाही, तर भाजपाला सत्ता हवी होती म्हणून शिवसेना फोडण्यात आली. 106 आमदार असताना आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, बघा आम्ही किती मोठा त्याग केला, असे जे दाखवत होते. ती त्यांची खरी निती नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचे आणि स्वत: सत्ता उपभोगायची एवढाच भाजपाचा डाव आहे,’ अशी टीका जाधव यांनी केली.