खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत; भाजपच्या निशाण्यावर पवार – ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली असून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणाचे कनेक्शन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जोडले आहे.

अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, आज ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत. दरम्यान, सिल्व्हर ओक हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्याचं नाव आहे तर वर्षा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बंगल्याचं नाव आहे त्यामुळे भातखळकर यांचा रोख याच दोघांवर होता हे स्पष्ट आहे.

काय आहे प्रकरण –

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी ईडी ने छापमारी सुरू केलीं आहे. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान, अनिल देशमुख सध्या घरात नसून ते दौऱ्यावर असल्याचं कळत आहे.