फडणवीसांनी दिल्या उद्धव ठाकरेंना ऍडव्हान्समध्ये शुभेच्छा..म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून महाराष्ट्रात निर्माण झालेला पेच आता संपुष्टात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातील विधान परिषदेच्या जागांवर निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने २७ मे च्या आधी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला केलेल्या विनंतीचं फडणवीस यांनी स्वागत केलं असून यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल असं म्हटलं आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले.

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्य माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, “करोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. संविधानाच्या तत्वांचे पालन करतच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो”.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल”. “यातून एक बाब स्पष्ट झाली आहे की, लोकशाही प्रक्रियेत संवादातूनच मार्ग निघत असतो. संवैधानिक पदावर आसीन व्यक्तीवर अकारण टीका करून कोणताही फायदा होत नाही,” असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.

 

Leave a Comment