एनसीबीचं नाव काढलं की नवाब मलिकांच्या पोटात का दुखतं? फडणवीसांचा खोचक टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ड्रग केस प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या कोठडीत आहे. मात्र आर्यन खानला घेऊन जाणाऱ्यांसोबत भाजपचे पदाधिकारी कसे? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मलिक यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. मलिक यांच्या पोटात का दुखते हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या दुखऱ्या नसवर मी बोट का ठेवू? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

फडणवीस म्हणाले, ड्रग्स होते की नाही पार्टी होते की नाही हे काढण्याऐवजी हा होता की तो होता हे नवाब मलिक सांगत आहेत. पण एनसीबीचं नाव काढलं की नवाब मलिकांच्या पोटात का दुखतं? त्यांचं हे दुखणं सर्वांना माहिती आहे, मला त्या जखमेवरील खपली काढायची नाही, अशी खोचक टीका देखील फडणवीसांनी केली आहे.

दरम्यान, लखीमपूर प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार कारवाई करेलच. पण, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी, पुराने नुकसान झालेल्या राज्यातील आक्रोशित शेतकर्‍यांचा अधिक विचार राज्य सरकारने करावा, तरच त्यांना दिलासा मिळेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.