हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीच्या निवासस्थानी प्रसिद्ध रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. देशपातळीवरील अनेक राजकीय परिस्थितीबाबत त्यानी आढावा घेतल्या नंतर पवारांनी देशातील प्रमुख भाजप विरोधी नेत्यांची बैठक उद्या बोलावली आहे. दरम्यान, शरद पवार- प्रशांत किशोर भेटीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडकून टीका केली आहे.
प्रशांत किशोर यांच्यासारख्या स्वयंघोषित भाडोत्री चाणक्याला भेटावं लागतंय याचा अर्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा अस्त होतोय,’ अशा शब्दांत पडळकरानी पवार – प्रशांत किशोर भेटीवर जोरदार टीका केली आहे.
सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा पवारांचा अजेंडा – नवाब मलिक
दरम्यान, देशातील सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा अजेंडा पवारांनी ठरवाला आहे. सुरुवातीला मोजक्या पक्षांसोबत पवारांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर सर्वांना एकत्र कसं आणलं जाईल त्याबाबत सर्व नेते ठरवतील, अशी माहिती मलिक यांनी दिलीय. मंगळवारी पवारांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेससह काही पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याचंही मलिक यांनी सांगितलं




