जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार; पडळकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही कारण आरक्षणाच्या लढाईत ओबीसी मैदानात नव्हतेच असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार आहेत अशी टीका पडळकरांनी केली आहे.

पडळकर म्हणाले, जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही. कारण मंडल आयोग आरक्षण येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला होता. वंचितांच्या आरक्षणाला नाकं मुरडली होती. त्यावेळी शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतलं होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला?, असा सवाल करत जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खुश करणारे कंत्राटी कामगार आहेत अशी टीका पडळकरांनी केली.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले-

ठाण्यातील ओबीसी एकीकरण समिती तर्फे आयोजित सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमावेळी आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणाचा विषय मांडला आहे. खरं तर माझा ओबीसींवर फारसा विश्वास नाही. मंडळ आयोगाचे आरक्षण हे ओबीसी साठी होत मात्र आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा ओबीसी मैदानात लढायला नव्हते असे आव्हाड यांनी म्हंटल. ओबीसींवर ब्राह्मण्यवादाचा पडगा इतका आहे की आपण श्रेष्ठ आहोत असं त्यांना वाटतं.असेही ते म्हणाले.