हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार योजना व ऊर्जा खात्याच्या कामाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागाच्या 6 हजार 500 कोटी रुपयांच्या कामांची 15 दिवसांत राज्य सरकारने चौकशी करावी, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले आहे.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांनी जे भ्रष्टाचार केले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराचे भाजप नेत्यांकडून वाभाडे बाहेर काढले जात आहेत. त्यामुळे सरकारमधील काहींनी आता चौकशी करतो, अशी भीती दाखविणे सुरू केले. विरोधी पक्षावर दबाव बनविण्याकरिता हे सर्व सुरू आहे. खरे सांगायचे झाले तर चौकशी करण्याची धमक या ठाकरे सरकारमध्ये नाही. धमक असेल तर सरकारने चौकशी करून दाखवावी.
फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा विभागातील बरीच कामे झाली आहेत. त्यापैकी 6 हजार 500 कोटींच्या कामाची चौकशी होणार आहे. पण या चौकशीला 2 वर्षे का लावले? आताही एक महिना नाही तर सर्व यंत्रणा वापरून 15 दिवसात चौकशी करावी. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे घोटाळे बाहेर निघत आहेत. फडणवीस सरकारच्या काळात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी ऊर्जा विभागाच्या कामाचे कौतुक केले होते. आता त्याच कामाची चौकशी करत आहेत. पण यातून काहीही निघणार नाही, असेही बावनकुळे यांनी म्हंटले आहे.