कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पॉवरफुल्ल बैठक व्हावी, ती पवारफुल्ल होऊ नये; प्रवीण दरेकर यांचा पवारांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेतली. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूने होणार असेल तर आम्ही महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करतो. मात्र, हि पॉवरफुल बैठक पवारफुल्ल बैठक होणार नाही, अशी मी ईश्वराकडे विनंती करतो,” असा टोला दरेकर यांनी शरद पवार यांना लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात वरळी सेंटर हॉटेलमध्ये गुप्त बैठक होत आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचं मुंबईत आंदोलन सुरु आहे दुसरीकडे शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्यात बैठक सुरु आहे. आता पवारांनी राज्य सरकारच्यावतीने वडीलकीच्या नात्याने पुढाकार घेत योग्य तो तोडगा काढावा. एसटी कामगारांचे विविध प्रश्न आहेत, एसटीचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे. ती तत्काळ सोडविणे गरजेचे आहे.”

शरद पवार यांनीच एसटीच्या अधिवेशनात आपण एसटीचे विलीनीकरणाची भूमिका घेऊ, असे जाहीर केले होते. आता त्यांनी वडीलकीच्या नात्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. राज्याच्या मी मुख्यमंत्र्यानी देखील महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी त्यांच्या हितासाठी अंतिम निर्णय घ्यावा, अशीही अपेक्षा या निमिताने करीत आहे. तसेच ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केलं आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केलं पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी केली.

Leave a Comment