हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजपवर व केंद्र सरकारवर निशाणा साधला जातोय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर सत्तेचा दुरूपयोग केला जात असल्याची टीका केली होती. त्यावरून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली. कोळसा टंचाईच्या संकटाला ठाकरे सरकार जबाबदार आहे, असे दानवे यांनी म्हंटले आहे.
केंद्रीयमंत्री दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पावसाळ्यात खदाणीत पाणी साचने किंवा कोळसा भिजण्याची अडचण होते, त्यामुळे राज्यांना कोळसा उचलण्याच्या केंद्राने सूचना दिल्या होत्या. पण, पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे टंचाई झाली. कोळसा टंचाईच्या संकटाला राज्य जबाबदार आहे.
सत्तेचा दुरुपयोग केंद्र सरकारकडून केला जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र, केंद्राकडून तसा प्रकार केला नसून उलट राज्यात केला जातो. शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमत होतं. पण पवारांनीही पुढाकार घेत सरकार बनवलं हा सत्तेचा दुरुपयोग नाही का ? असा सवाल दानवे यांनी केला.