हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे सरकारने पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे 2.8 रुपये व 1.44 रुपये कपात केली. सरकारच्या या निर्णयावरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. त्यामुळे आता या सरकारने दारूप्रमाणे पेट्रोल-डिझेल वरील करातही तातडीने 50 टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा,” अशी मागणी करत टोला लगावला आहे.
केशव उपाध्ये यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उपाध्ये म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात केली. तसेच जनतेला मोठा दिलासा दिला. आता त्यानंतर ठाकरे सरकारने दीड ते दोन रुपये कपात करून राज्यातील जनतेची क्रूर चेष्टा केली. महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे 32.55 रुपये तर डिझेलवर लिटरमागे 22.37 रुपये एवढा कर राज्य सरकार आकारत आहेत. वास्तविक पाहता केंद्र सरकारने कर कपातीबाबत आवाहन केल्यानंतरही ठाकरे सरकारने कर कमी केले नाहीत, उलट राजकारण सुरू ठेवले.
मुख्य प्रवक्ते श्री. केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद https://t.co/qqvBRAazuA
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 23, 2022
एकीकडे महागाईच्या नावाने सत्ताधाऱ्यांनीच निदर्शने करायची आणि दुसरीकरे कर कपात न करता जनतेची लूट सुरूच ठेवायची असा दुटप्पी डाव महाविकास आघाडी खेळत आहे. खरे म्हणजे ठाकरे सरकारने दारुवरील करात तब्बल 50 टक्क्यांची कपात करून दारू उत्पादकांना मोठा मलिदा मिळवून दिलाअशी टीकाही उपाध्ये यांनी केली.
‘इतक्या’ कोटींचा पडणार राज्याच्या तिजोरीवर भार
आज राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी केल्यामुळे जनतेला दिलासा मिळणार आहे. मात्र. याचा भार हा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. यामध्ये वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.