मुंबई । राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा दिलेला सल्ला या कटाचा भाग असल्याचा दावा थोरात यांनी यावेळी केला.
राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपचे नेते राजकारण करायचे नाही, म्हणून सांगतात. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. आज राज्यावर संकट आले असताना त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पाहत आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे. भाजपने सरकारविरोधात पुकारलेले आंदोलन हे ‘महाराष्ट्र बचाव’ नव्हे तर ‘भाजप बचाव’ या भूमिकेतून पुकारलं असल्याची टीका थोरात यांनी केली.
भाजप आंदोलनाच्या मूडमध्ये
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी येत्या २२ तारखेला भाजप ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करणार असल्याचे सांगितले. कोरोना राज्यात येऊन ६० दिवस उलटले. तरीदेखील राज्य सरकारने काहीच केलेले नाही. त्यामुळे आम्ही २२ तारखेला महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन सरकारला जाब विचारणार आहोत. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता जनतेने हे आंदोलन करून नागरिकांनीही आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”