मुंबई । अभिनेता सोनू सूद याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरूच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत मांडलं आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक चांगलं काम केलं. त्याचं कौतुक झालं पाहिजे’ असं फडणवीस म्हणाले. निसर्ग चक्रीवादळामुळं बाधित झालेल्या कोकणातील नागरिकांना भाजपच्या वतीनं आज मदतीचे ट्रक पाठवण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांना राज्यात सध्या गाजत असलेल्या सोनू सूद प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे वक्तव्य केलं.
‘आमचं सरकार राज्यात जलयुक्त शिवारचं काम करत असताना नाम फाऊंडेशन आणि आमीर खानची पाणी फाऊंडेशनही समांतर काम करत होती. पण आम्ही हेवेदावे ठेवले नाहीत. ते एकप्रकारे सरकारला मदत करत होते. त्यामुळं त्यांना मदत कशी करता येईल हेच आम्ही पाहिलं,’ असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेला दिला. ‘जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे. अशा बाबतीत राजकारण करणं पूर्णपणे चुकीचं आहे,’ असंही फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले होते संजय राऊत
‘कोरोना संसर्गाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो?,’ असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. कोरोनाच्या काळात अनेक क्रिकेटपटू व सेलिब्रिटींनी केलंय. पण त्यांचे दान गुप्तच राहिले. कारण हे सर्व लोक प्रायोजित नव्हते. सोनू सूदचा रस्त्यावरचा अभिनय चांगला असला तरी त्याचा दिग्दर्शक राजकीय आहे,’ अशी टीकाही राऊत यांनी केली होती.
कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय,’ अशी शंकाही राऊत यांनी उपस्थित केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”