विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही ; मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील संतापले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड:- राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं असताना याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप कडून सतत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अस म्हणत पाटील यांनी वडेट्टीवार यांच्यावर तोफ डागली.

पाटण तालुक्यातील नाडे येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या मेळाव्यात नरेंद्र पाटील बोलत होते यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. कुठल्याही मराठा नेत्याने ओबीसींचे आरक्षण मागितलं नसताना मंत्री विजय वडेट्टीवार जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याचे टीका नरेंद्र पाटील यांनी केली. विजय वडेट्टीवार यांना अकलेचा भाग नाही अशा शब्दात पाटील यांनी वडेट्टीवार यांचा समाचार घेतला. तसेच ज्या व्यासपीठावर मराठा समाजाच्या विरोधात ते बोलत होते, त्या व्यासपीठावर राजेश टोपे हे मराठा मंत्री टाळ्या वाजवत होते तेही राजकारणासाठी लाचार झाल्याची टीका त्यांनी केली.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. अजित पवार काही वर्षांपूर्वी विरोधी पक्षात असताना मराठा समाजासाठी बोलायचे परंतु तेच अजितदादा आता गप्प का आहेत असा सवालही नरेंद्र पाटील यांनी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like