काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये; भातखळकरांची राऊतांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून केंद्र सरकार व भाजपवर एका मुद्यावरून निशाणा साधला जात आहे. तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली होती. त्यांच्या टिकेवरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये,” असे भातखळकर यांनी म्हंटले आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “इतके पराकोटीचे कोडगे वक्तव्य करण्यासाठी कोणत्या प्रतीचा गांजा लागतो हे राउतच सांगू शकतात. सत्तेसाठी स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची धुणीभांडी करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या बाता करू नये,”अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केलीय.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच एक महत्वाचे विधान केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक होते. त्यांनी देशाला क्रांतीची दिशा दाखवली. ब्रिटीशांच्या मनात दहशत निर्माण केली. मात्र, त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न मागील काही काळापासून होत आहे. हे एकप्रकारे कारस्थान आहे, कपट आहे. ते उधळून लावलं पाहिजे. सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा,असे राऊत यांनी म्हंटले होते.

You might also like