भाजपकडून केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग; जयंत पाटलांची भाजपवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्यन खान यांच्या अटकेच्या प्रकरणात केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. “अशाप्रकारे पैशांची मागणी होत असेल तर या प्रकरणात बरेच लोक असल्याची शक्यता आहे. आता लोकांसमोर खरी वस्तुस्थिती यायला लागली आहे. केंद्र सरकार भाजप एजन्सीचा दुरुपयोग करतेय हे दिसतेय,” असे पाटील यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज ठाणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी ड्रग्ज संदर्भात एनसीबीविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. हे प्रकरण पाहिले तर खूप गंभीर आहे. तिथे खरंच अंमली पदार्थ होते का? अंमली पदार्थ तिथे कसं पोहोचले? कुणी ठेवले होते का? त्यानंतर जो घटनाक्रम आहे, भाजपची माणसं आरोपींना बाहेर आणताना दिसत आहेत. त्यानंतर अशाप्रकारे पैशांची मागणी होत असेल तर या प्रकरणात बरेच लोक असल्याची शक्यता आहे. केंद्र सरकार एजन्सीचा दुरुपयोग करतेय, लोकांकडून पैसे उकळण्याचं काम सुरु आहे.

क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरण संबंधातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान आज एनसीबीच्या एका पंचाचाच व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत त्या पंचाने एनसीबी आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जेलमधून बाहेर सोडण्यासाठी शाहरुखकडून 25 कोटी मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी समीर वानखेडेंना देण्यात येणार होते, असा खळबळ जनक दावा व्हिडीओत करण्यात आला असल्याने याबाबत अनेक राजकीय लोकांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Leave a Comment