सरकारने निजामशाही कारभार करून शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा…; गोपीचंद पडळकरांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर वीज तोडणीवरून निशाणा साधला आहे. “अव्वाच्या सव्वा वीजबील सक्तीने वसूल करणे, ऐन कापणीच्या-मळणीच्या वेळेस शेतकऱ्यांना वीजेची गरज असते, नेमके त्याचवेळेस वीज कनेक्शन तोडणे, असा निजामशाही कारभार राज्य सरकारने चालवला आहे, सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा पडळकरांनी दिला आहे.

गोपीचंद पडळकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वीज तोडणीच्या मुद्यावरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, कुठे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. ते वर्षाच्या बाहेर पडायला तयार नाहीत. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच महाविकास नव्हे तर महाभकास आघाडीने घेतला आहे. शेतकऱ्यांवर ज्यावेळी अतिवृष्टीचे संकट कोसळले त्यावेळी त्याला सरकारने कुठलीही मदत तर केलीच नाही, उलट अनेक ठिकाणी पंचनामेही करायला सरकारी यंत्रणा तयार नव्हत्या. आता थेट वीज तोडणी करीत शेतकऱ्यांचा अंत पाहत आहेत.

गरीब अशा पंप नसणाऱ्या शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबील देणे यात अनेक त्रुटी व अनियमीतता आहे. असंख्य शेतकऱ्यांनी पुराव्यांनीशी वीजबिला संदर्भातील भोंगळ कारभार उघडा पाडला आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा यावेळी पडळकर यांनी दिला आहे.