राजस्थान : वृत्तसंस्था – उदयपुर सराडामधील एका भाजप आमदाराने बनावट मार्कशीट दाखल करुन पत्नीला पंचायत निवडणुकीत उभे केले होते. यामुळे या भाजप नेत्याची तुरुंगात रवानगी केली आहे. उदयपूरमधील सलूंबरचे आमदार अमृतलाल मीणा यांनी पत्नीची खोटी मार्कशीट देऊन पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. पत्नीची बनावट मार्कशीट दाखवून निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कोर्टाने या आमदाराचा जामीन अर्ज फेटाळून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस त्यांना तुरुंगात घेऊन गेले.
आमदार अमृतलाल मीणा यांना कोर्टाने तीन आठवड्यांपूर्वी सरेंडर करण्यास सांगितले होते. मीणा यांनी शनिवारी आरोग्याचे कारण देत कोर्टाकडून वेळ मागितला आणि आज ते कोर्टासमोर हजर झाले. या सुनावणीदरम्यान कोर्टाने अमृत लाल मीणा यांची जामीन याचिका फेटाळून लावली. आणि त्यांना तुरुंगात पाठवले. सध्या त्यांना सलूंम्बर येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
मीणा यांच्या पत्नीचे नाव शांतादेवी असून त्या सेमारीच्या सरपंच आहेत. त्या पाचवी पास असल्याचे बनावट मार्कशीट दाखवून पंचायतीची निवडणूक लढल्या होत्या, असा आरोप करण्यात येत होता. या संपूर्ण प्रकरणात आमदार अमृतलाल मीणा यांना आरोपी ठरविले गेले. यानंतर शांता देवी यांच्या मार्कशीटचा तपास करण्यात आला, ज्यात ते प्रमाणपत्र बनावटी असल्याचे आढळून आले. या मार्कशीटवर अभिभावक म्हणून शांता देवीचे पती आमदार अमृतलाल मीणा यांचे हस्ताक्षर आहे. या आधारावर त्यांना आरोपी करण्यात आले.