हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नारायण राणेनी महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली . त्यानंतर आज ध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली असून बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली. या निवडीनंतर राणेंनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील असा टोला राणेंनी लगावला
नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. ११-७ ने आपण महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठमोठी लोकं आली. फार काही बोलली. ही लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील अशा शब्दांत राणेंनी अजित पवारांचा समाचार घेतला.
अजित पवार नेमकं काय म्हणाले होते –
जिल्हा बँकेच्या निमित्ताने अजित पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही”, असं म्हणत त्यांनी राणेंवर निशाणा साधला होता.