हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असून त्यांनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गट यांची महायुती आहे. यामध्ये इतर लहानसहान पक्ष सुद्धा सामील आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे जागावाटप नेमकं कस होणार? कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. त्यातच आता महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, एकूण ४८ लोकसभा मतदारसंघापैकी भाजप सर्वाधिक ३२ जागा लढवण्याची शक्यता आहे. आज मंगळवारी नवी दिल्लीत भाजपच्या होणाऱ्या बैठकीत त्या 32 जागांचा आढावा घेतला जाणार आहे.
भाजप ३२ जागा लढवून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची १६ जागांवर बोळवण करणार आहे. यातील १० जागा शिंदे गटाला तर ६ जागा अजित दादांच्या गटाला मिळण्याची शक्यता आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. दुसरीकडे रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांची रासप, बच्चू कडू यांची प्रहार हे घटक पक्षही महायुतीत आहेत मात्र त्यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता अजिबात नाही.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीसाठी राधकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, गिरीष महाजन, अतुल सावे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजुन कंबर कसली आहे. त्यामुळे भाजप दिग्गज नेतेमंडळींना लोकसभेला उतरवण्याची शक्यता आहे. यामध्ये हर्षवर्धन पाटील, गिरीष महाजन, राधाकृष्ण विखे पाटील या नेत्यांचा समावेश असून शकतो.