शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा?? मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट दोघेही उत्सुक आहेत. शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न सुरु असून हे मैदान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाठवण्यात आलेल्या पत्रातून परवानगी नाकारण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण यावेळी महापालिकेने सांगितले आहे. दोन्ही गटांमध्ये गणपती विसर्जनावेळी राडा झाला,त्यानंतर प्रभादेवीमध्ये राडा झाला. या राड्यामुळे शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. शिवाय शिंदे गटालाही परवानगी देण्यात आलेली नाहीये. शिंदे गटाने आधीच बीकेसी मैदान बुक केलं आहे त्यामुळे शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागेल.

दरम्यान, मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारल्यानंतर आता शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा फैसला हायकोर्टात होणार आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. काहीही करून शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यात येईल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठणकावून सांगत आहेत त्यामुळे कोर्टात काय होत आणि शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे.