हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांनासूचना देणारे पत्र लिहिलं आहे. कोरोना नियमावलीचं पालन करण्याच्या सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत. तसंच, RTPCR चाचण्या वाढवा आणि सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर नजर ठेवण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.
या पत्रात राज्यांना कोविड चाचणी पायाभूत सुविधा वाढवण्यास सांगण्यात आले आहे. पुरेशी चाचणी नसल्यास, संसर्ग पसरण्याची खरी पातळी निश्चित करणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे, राज्यांनी चाचण्यांच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.
राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवणे, त्यांनी मागील कालावधीत केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती, तपशील घेण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे. ज्या भागात अलीकडील पॉझिटिव्ह केसेस जास्त आहेत, त्या हॉटस्पॉट्सचे सतत निरीक्षण करणे. सर्व हॉटस्पॉट्समध्ये, चाचण्या करून पॉझिटिव्ह नमुने नियुक्त INSACOG लॅबमध्ये त्वरीत जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे आदेश दिले गेले आहेत. कुठल्याही हॉटस्पॉट्सला लगेच कंटेनमेंट झोन म्हणून निर्धारित करण्याच्याही सुचना आहेत.