हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनासारखी महाभयंकर स्थिती निर्माण झाली आहे. अशी महाभयंकर कोरोनास्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल आहे, अशा शब्दात टीका करीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केली.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोरोनास्थितीचा आढावा घेतला. या आभासी बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आदि उपस्थित होते.
पंजाबमध्ये पाच दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असून छत्तीसगडमध्ये तीन दिवसांचा साठा शिल्लक असल्याचे अनुक्रमे अमरिंदर आणि बघेल यांनी सांगितले. आपापल्या राज्यातील जनतेला अधिकाधिक लसी कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी यावेळी केले. तसेच राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचा सल्लाही सोनिया यांनी यावेळी दिला. केंद्र सरकार देशात कोरोनास्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून काँग्रेसशासित राज्यांनी आपल्या प्रयत्नात कसूर करू नये, असा आदेशही सोनिया गांधी यांनी यावेळी दिला.