हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली असून केंद्रीय गृहमंत्री राज्यपालांच्या वक्तव्यांची चौकशी करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खा. उदयनराजे भोसले यांनी पुणे येथील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिह कोश्यारी याच्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे चौकशीची व राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे म्हंटले होते. त्याबाबतचे पत्रही त्यांनी राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २३ नोव्हेंबर रोजी पाठवले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून त्यांच्या पत्राची दखल घेण्यात आली आहे.
राष्ट्रपती भवनाकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा मुद्दा विचारात घेण्यात आला असून राज्यपालांनी आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत त्यांची शहानिशा केली जाणार आहे. यामध्ये राज्यपालांची चौकशीही केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपालांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांनावर ठोस कारवाई करणेबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले.@rashtrapatibhvn pic.twitter.com/tCurxhhBBV
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 23, 2022
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात उदयनराजेंनी काय म्हटलंय?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपालांनी अवमानकार विधान केले. त्यामुळे मलाच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला वेदना झाल्या आहेत. राज्यपालांचं ते विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे. सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. यापूर्वीही त्यांनी असेच विधान केलं होतं. अशा विधानामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही या विधानाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे उदयनराजे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.