तेव्हा पवारच म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारला आहे;’ चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय काय? असे म्हणत पवारांनी सरकारचा पाठिंबा काढला होता. आता मात्र आघाडी सरकारच्या हातालाच नव्हे, तर बुद्धीला लकवा मारल्याची स्थिती आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सांगलीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताच ताळमेळ नाही. या सरकारमधील नेत्यांकडून एकही काम पूर्ण झालेले नाही. अजूनही राज्यातील महत्वाचे असलेले मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटलेले नाहीत. मात्र, या सरकारने प्रत्येक समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे.

अजूनही राज्यात काही ठिकाणी विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. राज्यात 60 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी अजून सरकारला यावर तोडगा काढता आलेला नाही. फडणवीस सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना या महाविकास आघाडी सरकारने बंद पाडल्या असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.