हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक आमदारांसह भाजपसोबत गेले आणि शिंदे फडणवीस यांच्या सरकार मध्ये सामील झाले. परंतु शरद पवार मात्र भाजपसोबत जाण्यास तयार नाहीत. अजित पवारांच्या गटाने वारंवार विनंती करूनही शरद पवार (Sharad Pawar) आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र याच दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या एका विधानाने पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आहे. शरद पवार आत्ता जरी भाजपसोबत येण्यास तयार नसेल तरी काही काळ थांबा, तुम्हाला वेगळे चित्र दिसेल असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
परभणी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, शरद पवारांची भूमिका आज जरी वेगळी असली तरी जीवनामध्ये कालांतराने काही ना काही वेगळेपण येत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार आणि खासदार हे अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे कालांतराने शरद पवारही याचा विचार करतील. राज्य आणि देशाच्या हितासाठी ते सुद्धा भाजपसोबत येतील. त्यामुळे काही काळ थांबा, थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. देशाच्या कल्याणाकरिता काय केलं पाहिजे? याचा विचार शरद पवार नक्की करतील असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजप हा पक्ष फोडणारा पक्ष या ठाकरेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, पक्ष फोडणे आणि पाठीत खंजीर खुपसणे हे उद्धव ठाकरे यांच्या रक्तात आहे. असले उद्योग भाजप करत नाही. तसेच 2024 पर्यंत उद्धव ठाकरेंकडे फक्त चारच लोक राहतील. बाकीचे सर्वजण एकनाथ शिंदेंकडे जातील आणि काहीजण भाजपकडे जातील. त्यामुळे ठाकरेंची शिल्लकसेना 2024 नंतर शून्य सेना होईल असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंची खिल्ली उडवली.