हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. कोरोना साथीच्या रोगाचा महाराष्ट्र जोमाने मुकाबला करीत आहे. राज्यात आजच्या घडीला सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत परंतु पुढील काळात क्वारंटाईन साठी जादा सुविधा लागतील. औषधी, व्हेंटिलेटर्सची तसेच उपचारांसाठी रूग्णालयांची गरज भासेल. यासाठी लष्करी रूग्णालयांची प्रसंगी मदत घ्यावी लागेल, याविषयी उपाययोजना करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधांनांना केली.
सध्या या रोगाच्या दुसऱ्या टप्यातील संक्रमण अवस्थेत आपण आहोत. तिसऱ्या टप्यात न जाण्यासाठी आपल्याला उपाययोजनांची गती वाढवावी लागेल, विशेषत: चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. महाराष्ट्र शासनाने देखील वेळीच पावले उचलून कोरोनाचे संक्रमण अधिक वाढू नये यासाठी प्रयत्न केले आहेत, रूग्णांची संख्या कमी दिसत असली तरी या रोगाच्या फैलावाचे स्वरूप पाहता भ्रमात राहण्यात अर्थ नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
22 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमाने बंद करण्यात येणार आहेत. तोपर्यंत 20 ते 25 हजार प्रवासी देशात-राज्यात परततील. या प्रवाशांचे क्वारंटाईन करावे लागेल किंवा त्यांच्यावर उपचार करावे लागतील. त्यादृष्टीने सुविधा वाढविण्याची गरज आहे. मुंबई-पुणे-नागपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर उतरलेले परदेशातून आलेले प्रवासी मिळेल त्या वाहनांनी आपापल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतील, त्यांना रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर असेल. यावर उपाय शोधण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.