हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन संभाजीनगर करण्यासाठी शिवसेना आग्रही असताना काँग्रेसने मात्र तीव्र विरोध केला आहे. यावरून महाविकास आघाडी मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या @CMOMaharashtra या अधिकृत ट्वीटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आल्याने त्यावर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला असतानाच आज पुन्हा एकदा याच ट्वीटर हँडलवर संभाजीनगर असा उल्लेख करत ट्वीट करण्यात आले आहे. या ट्वीटमुळे शिवसेना विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे
"काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे…(१/२) pic.twitter.com/aS5rZJGfnZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 7, 2021
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवर बुधवारी सर्वप्रथम औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयाच्या इमेजवर हा उल्लेख होता. ‘संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस मान्यता’ असे या इमेजवर नमूद करण्यात आले होते. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनच आक्षेप नोंदवला होता. ‘महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया’, असे थोरात यांनी नमूद केले होते. असे असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्वीटर हँडलवर आज पुन्हा एकदा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’