धक्कादायक !! गडचिरोलीत काँग्रेसच्या नेत्याकडून अपक्ष उमेदवाराचे अपहरण

गडचिरोली प्रतिनिधी । राजकारण हे साम, दाम, दंड, भेद या तत्वांवर खेळलं जातं याचा प्रत्यय गडचिरोलीतील आरमोरी मतदारसंघात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी येथे काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम आणि त्यांचा मुलगा लॉरेन्स यांच्यासह दहा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अपहरण केल्याचा आरोप अपक्ष उमेदवाराने केला आहे.

बुधवारी रात्री सुकाळा येथून नाटकाच्या उद्घाटनानंतर आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम व त्यांच्या तीन सहकारी घरी परतत होते. त्यावेळी याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स व साथीदारांनी या चौघांचा पाठलाग केला. आणि वैरागड मनापुर फाट्यावर गाडी अडवून त्यांचे अपहरण केले. रात्री सलंगटोला येथे काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम हेसुद्धा या अपहरण नाट्यात सहभागी झाले. ताडाम यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नसला तरी प्रचारातून माघार घेण्याची धमकी त्यांना गेडाम यांनी दिली असल्याची तक्रार बग्गुजी ताडाम यांनी आरमोरी पोलीस स्टेशन येथे गुरूवारी रात्री नोंदवली. यानंतर आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स यांच्यासह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर दहा जणांवर ३६५ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

You might also like