मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाच्या लागलेल्या गळतीला उपाय म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. २५ सप्टेंबर रोजी प्रियांका गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यावर आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेचे देवेंद्र फडणवीस हे १९९९ पासून प्रतिनिधित्व करत आहेत. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने मुख्यमंत्र्यांच्या तोडीस तोड ठरेल असा उमेदवार सध्या काँग्रेस शोधत आहे. नवी दिल्लीत मागील काही दिवसापासून काँग्रेसच्या उमेदवार यादीवर विचार मंथन केले जात आहे. काँग्रेसची छाननी समिती यावर काम करत आहे. आज अथवा उद्या निवडणूक घोषित झाल्यानंतर २२ सप्टेंबरपर्यंत विधानसभेच्या काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी प्रकाशित केली जाईल असे बोलले जाते आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसचा कोणता उमेदवार निवडणूक लढणार याबाबत कमालीची उत्सुकता सर्वांनाच असली तरी काँग्रेस नेते त्या उमेदवाराबाबत बोलायला तयार नाहीत. ते सर्व दिल्लीत ठरणार आहे असे देखील काँग्रेस नेते खासगीत बोलत आहेत.