“पंतप्रधान मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह”; फेट्यावरून काँग्रेस नेत्याची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे मेट्रोचे उदघाटन केले जाणार आहे. त्यासाठी मोदी पुणे येथे येणार आहेत. भाजपने पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास फेटा तयार करून घेतला असून या फेट्यावरून काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी टीका आक्षेप घेत टीका केली आहे. “पंतप्रधान मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. त्यामुळे राजमुद्रा असलेला फेटा घालण्यात येऊ नये, असे जोशी यांनी म्हंटले आहे.

पुणे येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर टीका केली. यावेळी जोशी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला येत आहेत. त्यांना विशेष असा फेटा दिला घातला जाणार आहे. या फेट्यामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर करण्यात आलेला आहे.

राजमुद्रा ही महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असून, महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजपतर्फे सातत्याने अपमान सुरु असून राजमुद्रा असलेला फेटा वापरून भाजपने हेतुपुरस्सर या अपमानाची मालिका सुरु ठेवल्याचे दिसते, असे जोशी यांनी म्हंटले.

मोदींच्या दौऱ्याला काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जागोजागी निदर्शने –

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला काँग्रेसने विरोध केला आहे. डेक्कन आणि पुणे स्टेशन परिसरात काँग्रेसने मोदी गो बॅकचे बॅनर लावले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याविरोधात काँग्रेसने पुण्यातील अलका चौकात तर राष्ट्रवादीने पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलन सुरु केले आहे. काँग्रेसकडून गो बॅक मोदीच्या घोषणा दिल्या जात आहेत.