हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी महाराष्ट्र दौऱ्यात शरद पवार आणि रोहित पवार यांची जोरदार तारीफ करत भाजपवर हल्लाबोल केला आहे तसेच दिल्लीची सत्ता काबीज करण्याची संधी महाराष्ट्राला असून यामध्ये आम्ही गुजरातचे लोकही साथ द्यायला तयार आहोत, असे हार्दिक पटेल यांनी म्हंटल. कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी हार्दिक पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सभा झाली यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकला नाही. प्रत्येक लढाई स्वाभिमानाने लढतो हे दाखवून द्या. दिल्लीची सत्ता काबीज करण्याची संधी आली आहे. यामध्ये आम्ही गुजरातचे लोकही साथ द्यायला तयार आहोत, आम्हाला कधीही आवाज द्या, आम्ही आपल्या मदतीसाठी येऊ असे हार्दिक पटेल यांनी म्हंटल.
हार्दिक पटेल यांनी यावेळी रोहित पवार यांचेही तोंडभरून कौतुक केले. रोहित पवार शरद पवारांचे नातू जरी असले, तरी त्यांनी कधीच त्यांच्या नावाचा वापर केला नाही. रोहित पवारांनी स्वतःला सिद्ध केलं. आपण पवारांचे नातू आहोत, अशा आर्विभावात ते कधीच वागले नाहीत, असं म्हणत हार्दिक पटेलांनी रोहित पवारांबाबत कौतुकोद्गार काढलेत.
भाजपने गुजरात मॉडेल म्हणून ज्या गोष्टी देशासमोर आणल्या ती केवळ दिशाभूल आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. 50 लाख युवा बेरोजगार आहेत. महाराष्ट्रात आर्यन खानचे ड्रग्ज प्रकरण काही नसताना एवढं गाजवण्यात आलं. गुजरातमध्ये गेल्या वर्षभरात 50 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडलं गेलं. मात्र, त्याची माहिती दिली जात नाही, त्यावर चर्चाही होत नाही. केवळ महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी सुडाचे राजकारण खेळलं जात आहे असा आरोप हार्दिक पटेल यांनी केला.