हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली केल्या जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जात आहे. आज काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
तब्बल अडीच वर्षे एकत्रित सत्तेत असलेल्या काँग्रेस नेत्यांनी शिवसेने प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अनेक चांगले निर्णय घेतले. एकत्रित मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही केली. अजून पुढील अडीच वर्षे यशस्वीरीत्या आपण कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचा विश्वास काँग्रेसच्या सर्व नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडूनही पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार हे टिकणारच असे दावे केले जात होते.
काँग्रेस नेते व आमदारांनी मातोश्री येथे जाऊन माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली. pic.twitter.com/LRJGXRzZPP
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 30, 2022
मात्र, शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला. त्यानंतरही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेते व आमदारांनी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यानुसार आज काँग्रेसच्या सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री येथील बंगल्यावर जाऊन भेट घेतली.